नागेश्वर मंदिर ( खिरेश्वर -जुन्नर ) | Nageshwara Temple | Junnar
नागेश्वर मंदिर ( खिरेश्वर -जुन्नर )
जुन्नर शहराच्या उत्तरेस व माळशेज घाटापासुन पुर्वेकडे तीन चार कि.मी अंतरावर डावीकडे पिंपळगाव जोगा धरणाची भिंत दिसते याच भिंतीवरून आपण भिंत संपण्या आधी पश्चिमेस एक कच्ची वाट लागते. धरणाच्या भिंतीलगतच अगदी 400 मी.अंतरावर आपणास हे मंदिर निदर्शनास येत. हे मंदिर हेमाडपंथी असून यांचा इतिहास जवळपास आपणास नवव्या शतकात घेऊन जातो. अशा या मंदिराची निर्मिती नाशिक पासुन भीमाशंकर यामधील जंगल व दुर्गम भागात शिलाहर राजा झंज द्वारा निर्मित झाल्याचे पहावयास मिळते. याच स्वरूपातील जुन्नर तालुक्यात खिरेश्वर, कुकडेश्वर व पारूंडे येथील मंदिरे असून किल्ले चावंड वर असलेली पुष्करणी व चावंडा देवी जवळ असलेले अवशेष याच स्वरूपाचे असलेले आढळून येतात.
या नागेश्वर मंदिराचे मी केलेले निरीक्षण आतापर्यंत मी वाचलेल्या लेखापेक्षा काही अंशी वेगळेच आहे. व आत्तपर्यंत कधीच प्रकाश झोतात न आलेली छायाचित्रे आपणापर्यंत पोहचवतानाही आनंद होत आहे.
प्रथमदर्शी आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला तर त्या ठिकाणच्या छतास गंधर्वाच्या सोळा विविध रूपात मुर्त्या कोरलेल्या असून त्यातून आपणास भिन्न भिन्न गंधर्व शक्तींचा अर्थबोध होतो. त्याचपैकी तीन मुर्त्या संपुष्टात आलेल्या आहेत. याच छताच्या मधोमध पिपळवृक्षाच्या मुळांनी मंदिरात प्रवेश केल्याने येथील एक मुर्ती तुटून नामशेस झाल्याने तेथुनच मुळांनी अपप्रवेश केल्याचे निष्पन्न होते. त्याच मुळांना घंटा अडकवण्यात आलेली आहे. ही मुळे वेळेत काढण्यात आली नाहीत तर पुढील काळात येथे मंदिर होतं असच म्हणाव लागेल.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर गाभाऱ्याच्या छतास मध्यभागी एक छिद्र पडलेले असुन त्यात एक लोखंडी राॅड अडकवला आहे व त्या राॅडला एक कमंडलू अडकवण्यात आला आहे कि ज्यातून सतत टिप टिप पाणी पिंडीवर पडत असते. त्या राॅड अडकवलेल्या ठिकाणाहून वर कळसाकडे पाहीले तर छतावरील संपूर्ण भाग मोकळा म्हणजे पोकळ असल्याचे समजते. याच कारणामुळे या स्वरूपात बांधलेल्या मंदिरांची पडझड झालेली असावी. पडझड होण्याचे दुसरे कारण म्हणजे आपण इंग्रजांचा दाखला देतो, किल्यांच्या बाबतीतही सुरूंग लावून उडवले अस आपण म्हणतो परंतू याला आपण जबाबदार नाही का? मी तर म्हणेन खजिन्याच्या हव्यासापोटी या सर्व वास्तूंचे वास्तव्यच संपुष्टात आपणच आणले आहे. आजपण अनेक ठिकाणी या प्रकारच्या वास्तू रात्री खोदलेल्या पहावयास मिळतात. याला वेळीच आळा घालणे खुपच गरजेचे आहे.
मंदिराच्या बाहेर वर अनेक ठिकाणी मूर्ती बसवल्याचे चौरस निर्जन्य व कुतूहलाने कुणाचीतरी वाट पहात आहेत असा भास होतो. त्या मुर्त्या मंदिर परिसरात कुठेही दिसून येत नाहीत. मंदिराच्या पाठीमागे वर मध्यभागी असलेल्या तसेच गाभाऱ्याच्या प्रवेशव्दारावरील झोपलेल्या विष्णूच्या मुर्तीस आपाहीज करण्यात आले आहे. तीचा एक हात व एक पाय निकामी झाल्याचे स्पष्ट दिसते. मंदिरालगत बाहेर उत्तरेस चार कातळ कोरीव शिवलिंग दिसतात. व येथुन मंदिराच्या कळसाचे निरीक्षण केले तर मंदिर उत्तरेस झुकल्याचे संकेत मिळतात. मंदिर परिसरात अनेक भग्न अवशेष पहाता लक्षात येत कि या मंदिराची पुरातन रचना कमीत कमी एक एकरभर भू भागावर असावी, कि जी आज फक्त अर्ध्या गूंठ्यापेक्षाही कमी भू भागावर आहे. येणाऱ्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला नाही तर जुन्नर तालुक्यातील अतिशय पुरातन असणारी ही वास्तू अंतिम घेत असलेला स्वास बंद करून ती आपणापासून नक्कीच दुर व येणाऱ्या पिढीला दुर्मीळ होईल अस मला वाटत.
साभार / छायाचित्र -
श्री.खरमाळे रमेश , शिवनेरी भुषण
( माजी सैनिक खोडद )
८३९०००८३७०





Comments
Post a Comment