आवनी वाघिणीच्या प्रसंगाने मला जिवघेणा रेस्कु आठवला | And... I remembered the rescue | Junnar
आवनी वाघिणीच्या प्रसंगाने मला रेस्कु आठवला...
दिवसभर केलेल्या कार्यक्षेत्रातल्या भटकंतीने शरीरात अस्वस्थता खुपच जाणवत होती. परंतु ऑफिसियल कामाची माहिती सकाळी द्यायची होती म्हणून रात्री 11:00 वाजेपर्यंत ते कागदपत्रे चाळत बसलो होतो. फाईल बंद करून ती बाजुला ठेवत विश्रांतीसाठी डोक टेकाव व पहूडल्या पहूडल्या मधुर स्वप्नांच्या दुनियेत एक फेरफटका मारून थकवा दुर करावा या विचारांतच होतो, तेवढ्यात टेबलवर ठेवलेल्या मोबाईलची बेल वाजु लागली. मोबाईल स्क्रिन वरील नाव वाचताच हा फोन रिसिव केला तर निश्चितच रात्रभर जागे रहावे लागणार याची खात्री होती.
मनात एका नकारात्मक व एका सकारात्मक विचाराने लगेच मंथन सुरू केले. नकारात्मक विचार सांगत होते कि फोन रिसिव करून नकोस परंतु या विचाराला मी नेहमीच तिलांजली देत आल्याने त्या विचारांचे प्रभुत्व मी झटकून टाकले व सकारात्मक विचार करत फोन रिसिव केला.
आतुन माझ्या वरिष्ठांचा आवाज आला मेजर आंबेगाव तालुक्यातील काठापुर येथे बिबटय़ाने धुमाकुळ घातल्याने तेथे बिबट्या ट्रॅप करण्यासाठी पिंजरा लावला होता. त्या पिंजर्यात बिबटय़ा ट्रॅप न होता बिबटय़ाचे पिल्लु ट्रॅप झाले आहे. त्या पिंजर्या भोवती पिल्लाची आई येरझारा घालत आहे. ही घटना परीसरात वार्यासारखी या व्हाॅट्सॳपच्या माध्यमातून पसरली आहे. सध्या बिबटय़ा रोजच दिसू लागला असल्याने बिबटय़ा प्रवण क्षेत्रातील समाजाला ही गोष्ट शुल्लक वाटते व ते या बाबीचे गांभीर्य लक्षात न घेताच आपला जीवघेणा पराक्रम गाजविण्यासाठी कुठलेही संरक्षण न घेता पुढे येतात कि पिंजऱ्यात बिबट्या कसा अडकला असेल ते पाहण्यासाठी व अपघाताचे शिकार होतात. व ते खापर संबंधीत वनविभागाच्या माथ्यावर फोडले जाते. वनविभागाचे कर्मचारी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतात. पुढे जाऊ नका. जीव धोक्यात घालू नका, परंतु हे मात्र त्यांचीच खिल्ली उडवतात व न ऐकल्यासारखे करून पुढे सरकतात. हा आमचा नेहमीच रेस्क्यू करतानाचा अनुभव असतो.
फोनवर आलेला मेसेज खुपच गांभीर्य पुर्ण होता. व तो आम्हाला आज नविनच होता. काठापुरला कोणत्याही स्वरूपाचा अपघात घडू नये म्हणून जुन्नरहुन 45 कि.मी अंतर कापत तेथे पोहचने खुप महत्वाचे होते. मी व आमचे तीन सहकारी मित्र काही मिनिटांत एकत्र येऊन काठापुरला रवाना झालो.
रात्रीच्या या काळोखात गाडी सोबत वेळ पण पुढे पुढे सरकत होती. रस्ता चांगला येताच ड्रायव्हरने एक्लेसटरच्या मुंडक्यावर पाय जोरात दाबून गाडीचा वेग वाढवला होता. रस्त्याच्या किनारपट्ट्या गाडीच्या वेगाच्या विरूद्ध दिशेला जोरात धावताना दिसत होत्या. समोरून क्वचितच एखादे वाहन येताना दिसत होते.
भिमाशंकर साखर कारखान्या जवळ येताच मोबाईलवर संपर्क करून बिबटय़ा ट्रॅप लोकेशनची माहीती घेतली. जवळपास दोन कि.मी अंतरावरच मेन रोडच्या उजव्या बाजूलाच 50 मीटर अंतरावर ते लोकेशन असल्याचे समजले. तेथे पोहचण्यास पाच मिनिटे खुप होती.
आमची चारचाकी बाॅलेरो भोकरवाडी वस्तीतील शेतकरी शंकर रमाजी करंडे यांच्या मुख्य रस्त्यालगतच व पिंजरा लावलेल्या शेतापाशी थांबली. तोपर्यंत तेथील जमाव रात्र झाल्याने अंधाराच्या भितीपोटी आपापल्या घरी निघुन गेला होता. आमच्या जुन्नर टिमचे रेस्क्यू तेथुन सुरू झाले होते. आम्ही गाडीत बसून पिंजरा लावलेल्या ठिकाणचे व पिंजर्याचे निरीक्षण करू लागलो. गाडी समोरच पिंजरा होता व त्या पिंजर्यात अडकलेल्या आपल्या बाळाचे संरक्षण त्याची आई पिंजर्या वर बसुन करत होती. हे दृष्य जणू मला बिबटय़ा सफारी एरीयात असल्या प्रमाणे भासत होते. पुढील दृश्य पाहून आम्ही दंग होऊन गेलो. आई आपल्या बाळाला वाचविण्यासाठी किती आटापिटा करते ते पण कुणाला मदतीची हाक न मारता ते आम्ही पहात होतो. तीचा आवाज या धडपडीत बंद झाला होता. तीच्या कंठातून स्वासपण बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. पिंजर्यातील आपले बाळ ज्या ठिकाणाहून शक्य होईल तेथुन पाय बाहेर काढत होते, तेथे तेथे जाऊन ही माऊली त्याला प्रेमाने चाटत चाटत आधार देत होती. हे दृष्य पाहून माझ्या शरिरावरील रोम उभे राहत होते. कितीतरी रोमहर्षक माझ्यासाठी हे दर्शन होते. पिंजर्याच्या प्रत्येक दिशेने माझ्या बाळाला वाचविण्यासाठी जागा मिळते का हा शोध ही माता घेत होती. प्रत्येक गज ती हलवून तो गज निघेल व माझे बाळ सुरक्षित बाहेर येईल व माझ्या कुशीत घेऊन मी त्याला प्रेमाने कुरवाळील ही भाबडी आशा ती घेऊन खटाटोप करीत होती.
आमच्या रेस्क्यू टिमला हे दृष्य चित्रपटातील भावनिक दृश्या पेक्षा कितीतरी भावनात्मक होते. मुक्या प्राण्यांच्या प्रेमाचा सागर आज येथे आपल्या बाळासाठी भरती रूपात खवळताना पाहिला मिळाला होता. आमच्या टिमच्या प्रत्येकाच्या डोळ्यांत एक वेगळाच ओलावा आज निर्माण झाला होता. क्षणात वाटे आम्ही या मातेची परीक्षा तर घेत नाही ना? क्षणात वाटे पुढे झेपुन या बाळाला आझाद करावे.
ही माता आमच्याकडे मदत मागत होती. तीचे केविलवाणे डोळे व नजर आमच्या ह्रदयावर वेगळेच अघात करत होते. तीचा स्वभाव अगदी नम्र भावनेप्रमाणे भासत होता. ती ज्या आशेने आमच्या कडे पहात होती की तीला वाटत होते की हे माझ्या बाळाच्या सुटकेसाठी धावून आलेले देवदूतच आहेत.
तेथील परिस्थिती व तेथील भयानकता आम्ही या दृश्या सोबत टिपत होतो. पिंजरा तेथुन रात्री उचलने खुप महत्वाचे होते. कारण सकाळ झाली तर येथील वातावरणाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार होते. पिंजर्या समोरच उसाची शेती असल्याने ती माता कुणावर कधी झडप घालेल व कुणाचा काळ उजाडेल हे सांगणे कठीण होते. रात्रभर आपल्या प्रयत्नांना यश न आल्याने ही माता चंडीकेचे रूप कधी धारण करेल हे सांगणे कठीण होते. जमलेली भिड बाजुला करणे खुप मेहनतीचे व जोखमीची काम होणार होते.
समोरच्या मायलेकराच्या वात्सल्याचे भावनात्मक दृश्य नजरे आड होऊ नये असे वाटत होते. परंतु वेळ पुढे पुढे सरकत होती. कर्तव्यात जास्त विलंब नको म्हणून आम्ही आमच्या वरिष्ठांशी विचार विनिमय एका संरक्षित जागी बसून करू लागलो. सकाळच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी खुप रिस्क असल्याने काहीतरी निर्णय घेणे गरजेचे होते. त्या काळोखात पिंजरा उचलने म्हणजे प्रत्यक्ष मृत्युला आमंत्रण देण्यासारखे होते. मनगटावरील घड्याळ तीन वाजलेले दाखवत होते.
आमचे संपूर्ण अधिकारी ,कर्मचारी व तीन स्थानिक येथील परिस्थितीचा आढावा घेऊन कसे रेस्क्यू करता येईल त्यासाठी काय करावे लागेल या बाबत आमचा ठोस निर्णय झाला. मातेच्या स्वाधीन तीच्या बाळाला करा हा ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय आम्हाला खरोखरच कौतुकास्पद वाटला. कारण बाळाला घेऊन जाणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखे होते. बाळाची आई चिडुन कधी कुणावर झडप घालेल सांगणे कठीणच होते.
फटाके फोडून व गाड्यांचे हाॅर्न वाजवुन तेथील या बिबट्या मादीला पिंजर्या पासुन दुर करण्यात आले. पिंजरा मधोमध ठेवून व चार बाजुला बाहेर तोंड करून चार वाहने उभी केली. मी स्वत: पिंजऱ्यातून बाळाला बाहेर करण्याची जबाबदारी घेतली होती. कारण आईची तळमळ काय असते हे मी जवळपास प्रत्यक्ष दिड तास पाहत होतो. पिंज-यातुन बाळाला रिलीज करणे एवढे सोपे नव्हते. बाळाची आई कधी येईल आणि माझ्यावर कधी झडप घालेल हे सांगणं कठीण होतं. गाडीत मी क्लीनर साईटवर मी बसलेलो होतो. त्या ठिकाणी बसून पिंजऱ्याचे दार उघडायचे होते आणि बांबूचा वापर करून त्या दरवाजाला वर उचलायचे होते. सर्वजण त्या पिल्लाची आई कोणत्या बाजूने येते हे पाहात होते. बांबू पिंजऱ्याचा दरवाजाच्या कडीत वर उचलून अडकवन अवघड जात होतं. शेवटी दरवाजाच्या काचा खाली करत तो बांबू दरवाजाच्या लोखंडी कडीत मी अडकवला आणि तो उचलण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा काही केल्यावर उचलत नव्हता. शेवटी शरीर बाहेर काढत मी दरवाजा वितभर वर उचलला. तेवढ्यात त्या पिल्लाने दरवाज्यातून मान बाहेर काढत बाहेर झेप घेतली त्या क्षणी माझी नजर त्या पिल्लाकडे गेली. पाहतो तर सर्वांच्या नजरा चुकून त्या पिल्लाची आई त्या ठिकाणी पिल्लापाशी पोहोचली होती. माझा थरकाप उडाला. मला खूप भीती वाटली. काय होईल आणि काय नाही सांगणे कठीण होते. मला काही क्षणात घाम फुटला. परंतु त्या आईने माझ्याकडे लक्ष न देता, आपल्या बाळाला सोबत घेऊन धूम ठोकली आणि मी पण सुटकेचा श्वास सोडला. आज जेव्हा अवनी वाघिणी विषयी मी वाचलं मी ऐकलं अशा वेळेस मला या प्रसंगाची आठवण झाली हा प्रसंग माझ्यासाठी खूपच चित्त थरारक होता. रेस्क्यू कोणताही असो तो निश्चितच थरारक असतो अनेक प्रसंगांना तोंड देत हे रेस्क्यू साध्य होत असतात. मानव आपल्या हितासाठी दुसऱ्याचा विचार करत नाही. तो हे ही ऐकुन घ्यायला तयार नसतो की मानव जन्म हा पृथ्वीतलावर प्रत्त्येक जीवनामुळेच अबाधित आहे. वनविभागच्या पुढे मानव किंवा प्राणी असे पेचप्रसंग निर्माण झाले आहे. शेवटी योग्य मिळालेले आदेश हेच कर्तव्य पार पाडत असत.
मित्रांनो फक्त मनुष्यालाच भावना असतात हा समज साफ चुकीचा आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला भावना आहे. प्रत्येकाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. तो हिरावून घेऊ नका. प्राण्यांना जर लिहीता वाचता आले असते तर निश्चितच त्यांनीही आपल्या हितासाठी कोर्टात याचिका दाखल केल्या असत्या. व आपले यश साकार केले असते. परंतु भगवंताने ही गोष्ट मानवालाच का दिली हा विचार करनेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून सांगू इच्छितो की प्राण्यांवरही प्रेम करा व त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांनाही जगू द्या. व जेथे जेथे मानव संरक्षण हितासाठी पिंजरे लावण्यात येतात तेथे चुकूनही क्षणिक नेत्र सुखासाठी रात्रीच्या वेळी तेथे जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये.
लेखक / चित्रांकन - श्री. खरमाळे रमेश
शिवनेरी भुषण
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक - जुन्नर
वनविभाग जुन्नर


Comments
Post a Comment