हरिश्चंद्रगड नळीची वाट

नळीची वाटेने ३:३० तासांत हरिश्चंद्रगड दर्शन तर सादले घाट मार्गे बेलपाडात ८:३० तासांत वापसी ट्रेक कसा करावा वाचा सविस्तर.
     नळीच्या वाटेने जायचा बेत आदल्या रात्री टाकळी ढोकेश्वर लेणी व पारनेर चे संगमेश्वर मंदिर पाहून परतीच्या प्रवासात केला होता. सोबत मित्र किरण बाणखेले, विवेक पिंगळे व शशिकांत मडके येणार होते. परंतु या तिघांचे येणे रद्द झाले व मी एकटाच नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडाला जायचा बेत पक्का केला. मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावचे माझे मित्र दिपक विसे यांना फोन केला व आपणास सकाळी नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडाला जायचे आहे म्हणून सांगितले. दिपकने प्रथमदर्शनी नकारच दिला. परंतु माझा जायचा बेत मात्र कुणी येऊ अथवा न येऊ तो पक्काच होता. एकट्याने नळीचा प्रवास करायचाच व शिखर फत्ते करायचेच ठरले होते. हा विचार करत असतानाच तेवढ्यात पुन्हा दिपकचा फोन आला. मी फोन रिसिव्ह केला. दिपक बोलला सर एकाच दिवशी गडावर न राहता खाली येणार असाल तर मी येतो सकाळी सोबतीला. मी पण लागलीच चालेल की म्हटले. माझे पण गडावर न थांबता खाली यायचेच नियोजण होते. मग काय सकाळी ५:२५ ला कल्याण - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वालिवरे (बेलपाडा) फाट्यावर आमचे दोघांचे भेटायचे नियोजन पक्के झाले. रात्री मी पारनेरहून घरी पोहचायला ८:३० वाजले होते. जेवण झाल्यावर ११:३० वाजेपर्यंत ढोकेश्वर लेणी व पारनेर येथील संगमेश्वर मंदिराबाबत ब्लाॅग लिहीत बसलो होतो. झोपताना सकाळी ४ :०० वाजताचा अलार्म मात्र न विसरता लावला होता.
     सकाळच्या ४:३० च्या मोबाईल अलार्म ने जाग आली. सगळी ट्रेकला जाण्याची आवराआवर करून ५:२५ ला जुन्नरहुन चारचाकी ने  बनकरफाटा मार्गे मढ, खुबी, माळशेज घाट मागे टाकत वालिवरे फाटा गाठला. माझी व दिपकची येथे पोहचण्याची बरोबर एकच वेळ झाली. दिपकने आपली दुचाकी भैरवगड ढाब्यावर लावत आम्ही चारचाकीने वालिवरे गावात ७:१५ वाजता पोहचलो.
        आदिवासी भागातील ४५० महादेव कोळी समाज व ४५० ठाकर समाज असे एकूण ९०० लोकसंख्या असलेल गाव होय. या गावात इयत्ता १ली ते १० पर्यंत शाळा असलेल्या गावातील कमळुच्या घरच्या अंगणात चारचाकी मी पार्क केली. येथे सोबतीला कमळुचा भाऊ काशिनाथ भेटला. योगायोगाने तो पण आज काम नसल्यामुळे खालीच होता. मग काय आमचा दुग्धशर्करा योग जुळून आला.बरोबर साडे सात वाजता गावातून आम्ही तीघे नळिच्या वाटेकडे भटकंती करण्यासाठी  निघालो. संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत आम्हाला पुन्हा वालिवरे गावामध्ये पोहचायचे होते. कारण दुसऱ्या दिवशी दिपकचा ट्रेक ग्रुप भैरवगडला जाण्यासाठी येणार होता. आमच्या सोबत अजून एक मेंबर आपल्या मनानेच पाठीमागून जाॅईन झाला होता. आता आम्ही चौघे झालो होतो. परंतु चौथा मेंबर आम्हाला कातळ चढाई पर्यंतच सोबत करणार होता. हा मेंबर काशिनाथच्या घरच्यांचा पाचनईतून तीन महिन्यांपूर्वी अचानक आलेला पाव्हणा होता. नळीच्या वाटेने जेवढे काशिनाथ व त्यांच्या दोन भावांनी जेवढे ट्रेक केले तेवढे ट्रेक मात्र या एकट्या बहाद्दराने फक्त नळीच्या मुख्य कातळ टप्पा पर्यंत केले होते.
    आम्ही सोबत पाणी जेवण व रोप घेतला होता.  . कोकणकडा समोर ठेऊन आम्ही वालिवरे गावात मधून पुर्वेकडील वाटेने चालू लागलो. पुढे उत्तरेला दिसणा-या कोकणकड्याशी आम्ही जवळिक करणार होतो. सूर्यदेवता पूर्वेकडुन सोनेरी किरणांचे जाळे फेकताना दिसत होती. परंतु आमच्या वर जाळे फेकण्यास ती असमर्थ होती. कारण अडथळा होता तो रोहीदास शिखराचा. सकाळच्या थंड हवेत जास्तीत जास्त मजल मारायची व  सुर्यदेवतेच्या किरणांच्या भात्यात कातळ तापण्याआधी कातळ टप्पा पार करायचा हा हेतू होता. डावीकडे नाफ्ता तर उजवीकडे रोहिदास पासून दूरवर देवदांड्याच्या रांगा सावलीत विसावलेल्या दिसत होत्या. सुरुवातीला शेतातून हळूहळू चालत आमची वाट मोकळ्या वनातून रानात शिरली होती. पारुंडी नदीला अगल बगल देत आम्ही मळलेल्या वाटेने प्रवास सुरू केला होता. सकाळच्या वातावरणात रानात विविध पक्ष्यांचे आवाज कानी पडत होते, मध्येच वानर हूपहूप करत आपल्या साथिदारांना मानविय हस्तक्षेपाचे सतर्कतेचे संकेत देत होते.  कधी पारुंडी नदीला उजवीकडे ठेवत तर कधी नदित उतरत मोठमोठ्या दगड धोंड्यातून मिळेल तशी वाट काढत आमचा प्रवास सुरू होता. पारुंडी नदीत काही ठिकाणी अजूनही पाण्याची धार वाहत होती.पारुंडी नदीच्या पात्रात आम्हाला मोठ्या तीन नैसर्गिक पाय-या बनलेल्या दिसून आल्या. मधल्या पायरीवर बसून येथेच घरून आणलेल्या चिवड्याचा नाष्टा म्हणून अस्वाद घेतला. येथूनच नाष्टा होताच डावीकडून वाट वर चढू लागलो. आणखी थोडे वरच्या बाजूला आल्यावर पारुंडी नदीच्या उजवीकडे माकडनाळच्या दिशेने एक वाट जाते. ही वाट म्हणजे अशीच दगडांची रास, हल्ली या उजव्या नाळेने जाण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. या जंक्शन पर्यंत यायला आम्हाला साधारण एक तास लागला. ठराविक अंतराने थोड थांबत आमची फोटोग्राफी पण चालूच होती. दगड धोंड्यांच्या या नाळेत वर खाली करताना एक मात्र खरं की उगाचच धावत उड्या मारत मोठमोठ्या ढांगा टाकत जाण्यात काहीच अर्थ दिसत नव्हता. त्यापेक्षा एका लयीत छोट्या ठराविक अंतराने पावलं टाकत चढाईची मजा घेणेच योग्य होत. त्यामुळे फार दम लागत नव्हता. नळीच्या वाटेचा ट्रेक म्हटलं तर या नळीच्या चढाईची मजा घेणं व दगडांतून चालण्याची मजा काय ती वेगळीच? अनुभवल्या शिवाय ती कळनेच कठीण.
    मुख्य नळीच्या वाटेने आता चढाईला सुरुवात झाली, होती आमचा चौथा बिनबुलाया मेहमान मधीमधी पायांत घूटमळत होता. तर थोडी उरावरची चढाई आली की पळतच तो टप्पा पार करत आम्हाला चढाई करण्याचे जणू शिक्षणच देत होता. उजव्या हाताला हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा आम्हाला जणू सांगत होता, लवकर वर माझ्या भेटीला या!  असा भास होत होता. नळीत जसं जसे आम्ही वर चढाई करून घुसत होतो तसे नळीच्या दुतर्फा बाजूला आकाशाला गवसणी घातलेले उंच उंच महाकाय कडे भन्नाट व सुंदर वाटत होते. कधी नाळेतुन उजवीकडे तर कधी डावीकडे आम्हाला चढलेली चढण्याची नशा जशी वाट मिळेल तिकडे फिरवीत होती. 
     काशिनाथ सांगत होता की दरवर्षी पावसानंतर नाळेत अमुलाग्र बदल पहावयास मिळतात. छोटे मोठे पॅच वाहत्या पाण्याने व पाण्यात वाहून घरंगळत आलेल्या दगडांमुळे निघून जातात तर काही नव्याने तयार होतात. ९ वाजन्याच्या सुमारास आम्ही पहिल्या रॉक पॅच जवळ पोहोचलो. येथे साधारण ३० फुटांची कातळ चढाई करावी लागणार होती. रोपचा वापर न करताच आम्ही हा टप्पा चढून वर गेलो. परंतु आपण जाणार असाल तर नक्कीच येथे रोप वापरावा. आमच्या सोबत असलेला पाव्हणा येथे मात्र अडकुन बसला. त्याने खुप वेळा चढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. जोरा जोरात तो ओरडुन सांगत होता मला पण वर घ्या. मला पण हरिश्चंद्रेश्वराचे दर्शन घेण्यासाठी यायचंय. परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आता त्याला माघारी परतावे लागणार होते. आम्ही आता १५ मिनीटांची नैसर्गिक कातळ पाय-यांची चढाई करत दुसऱ्या कातळ टप्प्याजवळ पोहचलो होतो. येथील या नैसर्गिक पाय-या ज्या खडकात नैसर्गिक बनल्या गेल्यात त्यांना भौगोलिक भाषेत स्टॅंडिंग डाईक असे म्हणतात. हे दृश्य अतिशय सुरेख असून अभ्यासकांचे लक्ष वेधून घेण्यासारखे होते. येथे उभे राहून पुर्वेकडे वळून तोंड केले की समोरचे माकडनाळेचे, शेंडी सुळका व रोहीदासाचे अद्वितीय सौंदर्य पहावयास मिळत होत. अद्यापही पाव्हण्याच्या आरूळ्या आमच्या सोबत येण्यासाठी कानात दुमदुमत होत्या.परंतु जेथे स्वत:ची सुरक्षितता करणे सोपे नव्हते तेथे या मुक्या जीवाला घेऊन कसे जाणार.  काशिनाथ सांगत होता की जेव्हा आपला आवाज या कुत्र्याच्या कानी जाणे बंद होईल तेव्हाच तो माघारी जाईल. 
   दुसरा कातळ टप्पा दक्षिणोत्तर होता. येथेही आम्ही रोपचा वापर न करता वर चढाई केली. परंतु आपण मात्र जाणार असाल तर नक्कीच रोपचा वापर करावा.  
     थोडे वर जाताच नाळेच्या मुखाशी झाडी दिसू लागली. नाळेचे प्रकरण १० मिनीटांनी संपणार होतं. हे ट्रेकरच्या नावाच्या शाळेचे प्रकरण शिकायला ३ तास ४५ मिनीटे लागले होते. आता नाळ व्यवस्थित पार केली होती. वर आल्यावर डावीकडे जंगलात एक वाट उतरताना दिसत होती. याच वाटेने आमचा परतीचा प्रवास होणार होता. या वाटेची ओळख म्हणजे "साधले" घाट होय. परंतु आम्हाला उजवीकडच्या वाटेने कोकणकडा मार्गे गडावर पोहचायचे होते. वेळ पाहिली तर ११:१५ झाले होते. आम्ही अर्थातच उजवीकडची वाट पकडली व दोन घोट पाणी घेत चढाईला लागलो. वाट झाडीतून असल्याने उन्हाचा चटका जानवत नव्हता. मात्र घामाच्या धारा कातळातील पाझरणाऱ्या पाण्यासारख्या शरिरातून वाहू लागल्या होत्या. कारण पवणराजाचे अस्तित्व येथे जाणवत नव्हते. येथेच पुढे एक कातळ टप्पा चढाई करत वर आलो. मागे वळून पाहिले तर पाचनई, पेठेची वाडी रस्ता तर नकटा त्यामागे नाफ्ताची जुळी शिखरं आणि कलाळगड फारच जवळ भासत होते. हा संपूर्ण व्यापलेला परीसर म्हणजे मुळा खोर्याचा भाग होय. थोडं पुढे जातो तर अजुन एक कातळ टप्पा आमच्या प्रतिक्षेत होता. तो पार करून आम्ही एका मैदानावर आलो. या ठिकाणी अजूनही पाण्याची वाहती धार होती. जोडीला सोनकी, जांभळी मंजिरी, घाणेरी, काटेकोरांटीची सुकलेली रानफुलें येथे दिसून येत होती. येथेच वाहते पाणी तोंडावर मारत मी फ्रेश झालो. येथून पुढे समोर असलेल्या कारवी वनस्पतीने भरलेलं हिरवेगार टेकुड आम्ही पार केलं व शेवटी आम्ही विशाल अशा कोकणकड्यावर पोहचलो. हरिश्चंद्रगडाचा मुख्य आकर्षण असलेला साधारण अर्ध्या किलोमीटर लांबीचा अर्धवर्तुळाकार प्रसिद्ध असा कोकणकडा याबद्दल फार काही आपणास सांगायची गरज नाही. कारण येथील डोंगर दर्‍यां साक्ष आहे की जो येथे आजपर्यंत गेला तो या कड्याच्या नक्कीच प्रेमात पडला.इंद्रवज्राची पहिल्यांदा नोंद इंग्रज अधिकाऱ्याने केली तो हाच कोकणकडा होय. येथून पाठीमागे वळून पाहिले की तारामती शिखराचे सुंदर दर्शन घडत होते. जोपर्यंत आपण तारामती शिखरावर जाऊन येथे तारामतीचे दर्शन घेत नाही तोपर्यंत हरिश्चंद्रगड दर्शन पुर्ण होत नाही असे म्हणतात. आम्ही आज हे दर्शन खालूनच घेणार होतो.
मी पश्र्चिमेसला तोंड करून खाली दरीत सरळ रेषेत वालिवरे अर्थात बेलपाडा कुठे आहे शोधत होतो. सकाळी कोठुन सुरुवात केली होती आणि कोणत्या मार्गाने कसे कुठून वर आलो हे पाहताना विश्वास बसत नव्हता. घड्याळ १२ ची वेळ दाखवत होते. फोटोग्राफी न करता येथे ३:३० तासांत सहज पोहोचता येणे शक्य आहे असा माझा तर्क आहे. सुंदर छायाचित्रे टिपत मुख्य मंदिराकडे मी व दिपक मार्गस्त झालो.काशिनाथ येथेच थांबून परतीच्या प्रवासाला सोबत येणार होता. प्रथम विश्वामित्र मंदिर दर्शन, लेणीतील गणेश दर्शन, पुष्करणी दर्शन, मुख्य मंदिर दर्शन,केदारेश्वराचे दर्शन घेत वापसीच्या मार्गाकडे आम्ही प्रवास सुरू केला.
     पुन्हा कोकणड्यावर पोहोचलो. येथे घरून आणलेल्या व हॉटेलातील दाळ भाताचा मी, दिपक व काशिनाथने अस्वाद घेत आम्ही १:१५ ला परतीला निघालो. सादल्या घाटाकडे आम्ही अतिशय वेगाने झेपावत होतो. आता चढाई न करता उतरणच होती. दमछाक होणार नव्हती परंतु उताराला जपून पाय ठेवणे आवश्यक होते. पुन्हा आम्ही नळीच्या वाटेच्या तोंडाशी १५ मिनिटांतच पोहचलो होतो. आता नळीच्या वाटेने पुर्वेला न उतरता  अगदि विरूद्ध दिशेने पश्र्चिमेस झाडीतून उतरणिला लागलो. २० मिनिटांतच आम्ही पाचनईच्या शेतात पोहोचलो होतो. पश्र्चिमेकडील हरिश्चंद्रगडावर जाणारा बैलघाटमार्ग दर्शन येथून घडले होते. समोरच कल्लाळगडाचे सुंदर दृष्य पाहून थकवा नाहीसा झाला होता. गडावर जाण्याची मनोमन खुप इच्छा होती. परंतु दिपकला ४ वाजता पोहचण्याचा दिलेला शब्द आड येत होता. गडाचे रूप डोळ्यात साठवून पाचनई कडून, बैलघाटाकडुन व नळीच्या विरूद्ध दिशेने  साधले घाटकडे जाणा-या पाऊलवाटेला आम्ही लागलो होतो. घाटात आमचा येथुन १० मिनिटांत प्रवेश होणार होता. त्या आधीच काशिनाथ ने वाटेवर जो थंड पाण्याचा वर्षभर वाहणाऱ्या झरा आहे तेथे थांबविले. शरीराची व मनाची मनसोक्त तृष्णा या पाण्यावर आम्ही भागवीली. येथेच काशिनाथचा मोबदला नको नको म्हणत असताना पण चुक्ता केला व प्रवासाला सुरुवात केली. अगदी १० मिनीटातच आम्ही घाटाच्या तोंडाशी पोहचलो. उत्तर दक्षिण उतार असलेला व ठाणे व नगरला जोडणारा हा एकेकाळचा कल्लोळगड व हरिश्चंद्रगडाला हाच तो साधला घाट मार्ग होय.कालांतराप्रमाणे या ऐतिहासिक मार्गाच्या ऐतिहासिक पाऊलखुणा नष्ट होत गेल्याची खंत वाटली परंतु पुसट अशा काही पाय-यांच्या खुणा व खोबण्या मात्र ठिकठिकाणी कातळाने पुराव्यासाठी जतन करून ठेवलेल्या पहावयास मिळाल्या. घाटातील मुख्य नाळ अगदीच तीनशे चारशे फुट सोपी आहे परंतु यानंतरची वाट उतरणीला अक्षरश: वाट लावणारी वाटली. सरकुन पडण्याची सगळ्यात जास्त भिती ते येथून पुढे. येथूनच उजविकडे आपणास भोकपाडा नेढे व नापता नेढ्याचे सुंदर दृष्य दिसते तर डाविकडील ३०० फुट उंचीचा सिलेंडर सुळका पाहताक्षणी निसर्गाच्या सुंदर व अवर्णिय जादुचा प्रयोग करून दाखवतो. आजपर्यंत फक्त एकच संस्थेने या सिलेंडर सुळक्यावर यशस्वी चढाई केल्याचे ऐकिवात होते. जवळपास दिड तासांची उतरण करत व कापलेल्या भातशेतीला तुडवत आम्ही वालिवरे गावात पश्र्चिमेकडून पोहचलो. घड्याळ ३:४५ ची वेळ दाखवत होते. १५ मिनिटे आजुनही दिलेल्या वेळेसाठी बाकी होती. आदिवासी सरकारी अनूदानित शाळेतील मुलांचा आवाज कानावर येत होता. जवळ गेलो तर मुले हॉलिबॉल खेळण्यात मग्न झाली होती. मग काय क्षणात सर्व काही झालेला शिन झटकून टाकला व मुलांसोबत १० मिनिटे हॉलिबॉल खेळण्यात मग्न झालो. परतीला निघायचं होतं, परंतु अजून हॉलिबॉल खेळायचा विचार होता. नाविलाज होता. ४:०० वाजता चारचाकी पार्क केली होती तेथे कमळुच्या घरापाशी पोहचलो. काशिनाथच्या आईने प्रेमाणे भरून आणलेला पाण्याचा संपूर्ण तांब्या शरिरातील पोटरूपी पिशवित रिचवला. माऊलीचे आभार व्यक्त केले. मित्रांनो कधी या वाटेने जाणे झालेच तर नक्कीच काशिनाथ आलो पोकळा ९५७९४७९६४६ या स्थानिक गाईडला सोबत घेऊन जायला विसरू नका. काशिनाथ,कमळु व त्यांचा भाऊ हे तिघेच फक्त वाटाड्या म्हणून या गावात काम करतात व आज गावाच्या नावलौकिकात प्रत्त्येक पर्यटकाच्या मनात भर घालताना दिसतात. येथून पुढे चारचाकीने प्रवास सुरू झाला. दिपकचा भैरवगड पाशी नाष्टा करून निरोप घेतला. आता मात्र दिवसभर तापलेला माळशेज थंड झालेला दिसत होता. वेडीवाकडी वळणे घेत व घाटातील गणेशाचे दर्शन घेत मढफाटा, गणेश खिंड मागे टाकत जुन्नरला ७:०० वाजता पोहचलो घरच्या पाखरांना कुरवळण्यासाठी.
      लेख व छायाचित्र:- रमेश खरमाळे
           ‌‌   माजी सैनिक खोडद
                ८३९०००८३७०

Comments

  1. खूप छान वर्णन

    ReplyDelete
  2. वा छान... निसर्गरम्य हवा तो शब्द... निसर्गमय असा शब्द नाही..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जुन्नर तहसील के ऐतिहासिक और प्राकृतिक दर्शन| Historical and natural treasure | Junnar

अश्मयुगीन जुन्नर तालुका.(बोरी गावची १४ लाख वर्षांपूर्वीची टेफ्रा राख)

म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी | Mhanswandi and khamundi ghat | Junnar