काळाच्या पडद्याआड गेलेली ऐतिहासिक भिल्लीणिची वाट अर्थात नांगरदरा घाटवाटा..
सन २०१७/१८ मध्ये नांगरदरा घाटवाटे बाबत एका what's up ग्रुप वर कुणीतरी विषय छेडला होता. ग्रुप कुठला होता मला आता स्पष्ट आठवत नाही व तेव्हा कुणीतरी फोन करून मला याबाबत विचारणा पण केली होती त्यांचे नाव पण नाव आठवत नाही. तेव्हापासून जुन्नर तालुक्यातील या घाटवाटे बाबत मी माहीती घेण्यासाठी खुपच धडपड केली होती खरी, परंतु कुठेही सुगावा लागेनासा झाला होता. खडकुंबे, फांगुळगव्हाण, घाटघर, अंजनावळे परीसरातील बहुतांशी बुजुर्ग मंडळींची व गुराख्यांची भेट घेत याबाबत विचारणा केली परंतु शेवटी माझे प्रयत्न असफलच ठरले. शेवटी हार न मानता याबाबत काही धागेदोरे प्रत्यक्ष भटकंती द्वारे हाती लागतात का पाहण्यासाठी ६/७ वेळा अंजनावळे डोंगर माथ्यावर एकट्याने जाऊन शोध घेण्याचा खुप प्रयत्न केला.
मुरबाड तालुक्यातील गावातील जंगल तुडवत ही घाटवाट शोधन सोपं नव्हतं कारण या घाटवाटेची तळातुन सुरुवात सापडणं शक्यच नव्हते व काळाच्या ओघात ती गाडली गेली असणार यात शंकाच नव्हती म्हणून डोंगर घाट माथ्यावरून एखादी घळ खाली पोहचते का हा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी डोंगर माथ्यावरून पण घाटवाट शोधण्यात अपयश पदरात पडले, पण प्रयत्न करणं मात्र सोडलं नव्हते.
एकेदिवशी या घाटवाटेवरचे काही शब्द कानावर पडले कि ही घाटवाट जुन्नर तालुक्यातील देवळे गावच्या दौंड्या डोंगर भागातुन जाते म्हणून. मग काय खुप अत्यानंद झाला व शेवटी तिचा शोध घ्यायला दोन मित्र घेऊन निघालो. चिंचेच्या वाडीतील एक होतकरू तरुण सोबत झाला. ट्रेकला सुरूवात केली डोंगराच्या मध्यभागी ऐतिहासिक पाऊलखुणा असलेल्या आठ दहा मोठ्या कोरीव पायऱ्या निदर्शनास पडल्या प्रचंड आनंद झाला व आपण योग्य घाटवाटेकडे वाटचाल करतोय याचे समाधान वाटले. कोकणकड्यावर पोहचलो परंतु तेथे काही वाट समजेणाशी झाली व स्थानिक सोबत असलेला संवंगडी बोलला आमच्या गावातुन एक घाटवाट आस्वलदरातुन तळेरानकडे जाते तर एक वाट सध्या स्लायडिंंगमुळे चढता येत नाही की जिचे नाव गावकरी नांगरदरा सांगतात तेथे जाऊया का? नक्कीच हे ऐकून मनाची द्विधा अवस्था झाली. नांगरदरा हा कोकणकड्यावरची कोकणात उतरणारी वाट आहे की तळेरानकडे जाणारी? चला म्हटलो ती तरी पाहुन घेऊ या. वनदेव डोंगर माथ्यावरून या वाटेला गवसणी घातली खरी परंतु जी नांगरदराची घाटवाट असायला हवी ती वाट हिच की दुसरी हा प्रश्न शेवटी मनात घर करून राहीला. काही तज्ञ गिर्यारोहक मंडळींच्याच नांगरदरा विषयी ब्लॉग २०२० मध्ये वाचून अनुभवयाला मिळाला व ज्याचे स्वप्न पाहत होतो ते वाचून अत्यानंद झाला. अनेक थरारक प्रसंग व कसरत व यासाठी लागणारा प्रचंड वेळ यामधुन लेखकांनी आपल्या या लेखातुन शब्द बध्द केला होता व तो लक्षवेधी ठरला. विशेष बाब म्हणजे या घाटवाटेवर असलेली घसरण व कशाचाच न भेटणारा आधार हा होता. मग मी लिहीलेली नांगरदरा ही नक्कीच घाटवाट नाही हे लक्षात आले व तळेरानला जायचा तो एक मार्ग आहे हे सिद्ध झाले. वाचनात आलेली घाटवाटा अनुभवयाचीच हा शेवटी निर्णय घेतला. यासाठी सोबत हवी होती ती एका तज्ञ गाईड व गिर्यारोहकाची. कारण या घाटवाटेवर झाडे लावणे तर अशक्य होते परंतु बिया रोपण करण मात्र नक्कीच शक्य होणार होते. ट्रेक रूटवर जेवढ्या शक्य आहे तेवढ्या बिया रोपण करायच्याच हा विषय फायनल झाला. यावेळी दोन ध्येय साध्य करता येणार होती. एक बीज रोपण व दुसरे म्हणजे भविष्यात काही पेचप्रसंग निर्माण झालेच तर तातडीची मदत देता यावी म्हणून या घाटवाटेची होणारी ओळख आवश्यक ठरणार होती.
ठाणे जिल्ह्यातील वालीवरे म्हणजे बेलपाडा गावातील सगळ्या ट्रेकर्स मंडळींना परिचीत असलेल एक शांत व संयमी व्यक्तीमत्व म्हणजे कमळु पोकळाशी याबाबत माझं बोलणं झालं होतंच. आम्ही सोबत पण अनेक विविध ट्रेकला या आधी पण गवसणी घातली होतीच त्यामुळे आम्ही एकमेकांशी चांगलेच चित परीचित झालेलो. प्रसिद्धीची हाव नसलेला व निसर्गाची व गिर्यारोहणाची तेवढीच जान असलेला हा सोबती होता.आता नुकताच एक पाऊस पडुन गेलेला होता. घसरण कमी असणार होती व पुढे पावसाला सुरुवात होणार होतीच. दोघांनी याबाबत चर्चा केली व बिया रोपण करायच्याच हा विषय लवकरच मार्गी लावायचा ठरवला. तसा या वाटेवरचा कमळुचा ५ अनुभव होता. कमळुची अटच होती आपण दोघेच हा ट्रेक करणार आहोत तिसरा कुणीही सोबत नसेल. मी हो म्हटले व आमचा घाटवाटेवरचा दिवस उद्या उजेडणार होता.
जायचा बेत पक्का झाला. आम्ही सकाळी ६ वाजता मोरोशीमधील भैरवनाथ (मनुचा ढाबा) हॉटेलपाशी आम्ही दोघे एकत्र भेटणार होतो. कमळु बेलपाड्यातुन तर मी जुन्नर हुन पोहचणार होतो. अचानकच संध्याकाळी कमळुचा फोन आला की मुलीच्या नर्सिंग ॲडमीशन मुळे आपला ट्रेक कॅन्सल करावा लागत आहे. मी पण बोललो ठिक आहे प्रथम कुटुंब नंतर ट्रेक. या वर्षी नाही तर जगलोच तर पुढच्या वर्षी एवढं काय. टेन्शन घेऊ नकोस. तो बोलला फायनली रात्री ९:३० वाजेपर्यंत सांगतो. मला सकाळीच सोडायला मित्र प्रशांत कबाडी हे येणार होते. ट्रेक कॅन्सल झाला म्हणून मी फोन करणार तेवढ्यात कमळुचा फोन आला. भावाचा मुलगा जाणार आहे आपण बीया रोपण करू या. आनंद गगनात मावेनासा झाला. ४:०० वा. चा अलार्म लावुन मी अंथरुणावर आडवा झालो. सकाळी प्रथम अलार्म ची रिंग वाजली व लगलीच प्रशांत भाऊंचा फोन आला २० मिनिटांत पोहचतो.
पत्नी आवाज दिला डबा तयार आहे. तुमचच आवरलेल नाही ही फटकार पत्नीकडून ऐकायला मिळालीच. प्रशांतभाऊ घरी पोहोचले होते मीच थोडा लेट झालो. सकाळच्या चहाची तलफ भागवत प्रशांत भाऊ मी निघालो होतो. गणेश खिंड, मढ पारगाव फाटा, वेळखिंड, माळशेज घाट मागे टाकत ५:५५ ला भैरवनाथ हॉटेलपाशी पोहचलो. येथून भैरवगडाचे प्रत्यक्ष मंदिर रूपातील दर्शन घडले. अगदी कळसाचे सुध्दा. या दृष्याच्या दोन क्लिक कॅमेरात कैद करायचा मोह मी आवरुच शकलो नाही. कमळु पोहचला नव्हता. १० मिनिटांत पोहचतो म्हणून फोनवर सांगितले होते. तो पर्यंत पुन्हा को-या चहाची चुस्की घ्यावी म्हणून हॉटेल मालकाकडे चार चहांची मागणी केली. चहा उकळुन हातात पडताच कमळू पोहचला होता. चहाच्या साखरेची गोड चव भैरवगड पायथ्यापर्यंत घशाला कोरड पडुन देणार नव्हती. चहा उरकून प्रशांतला टाटा बाय करून कमळू आणि मी निघालो होतो.
गिर्यारोहण साहित्य कमळु कडे तर जेवण आणि पाणी माझ्याकडे असा बंदोबस्त आमच्या सोबत होता. भैरवगडाकडे तोंड करून झपझप चालायला सुरुवात केली होती. साडे तीन ते चार तासांत अंजनावळे डोंगर माथा गाठायचाच हा बेत चालता चालता पक्का केला होता. कारण पाऊस दुपारनंतर केव्हाही येऊ शकतो हे कमळु सांगत होता. मी तर हे ऐकून अवाकच झालो होतो. कारण या ट्रेकला लागलेल्या वेळेबाबत काही वेगळेच वाचले होते व कमळु तर ४ तासांची वेळ सांगत होता. ते पण खरेच आहे कारण दोघांनी ट्रेक करणे व जास्त ट्रेकरनी हा ट्रेक करणे खरोखरच जास्तच वेळखाऊ असणार होतं यात शंकाच नव्हती. गिर्यारोहणातील सर्वात अवघड घाटवाट म्हणून नांगरदरा विषयी वाचनात आल होतं. कदाचित कमळु व आम्ही एकाच दिवसात शिरपुंजे ते आजोबा पर्वत व तेथुन पुन्हा पाचनई असा ३४ कि.मी च्या प्रवास अनुभवावरुन तो बोलला असेल असं मला वाटलं व ते सत्य असेल म्हणून पुढे चालत राहिलो. आमचा हा ट्रेक पाहण्यासाठी आज पवणदेवता पण शांत झाली होती. विविध पक्षांचा मधुर आवाज कानावर येत होता. हवेतील दमटपणा सकाळ असल्याने कमी जानवत होता. आंब्याच्या झाडाखाली पडलेले पाड पाहुनच मन प्रसन्न होत होतं. करवंदांनी लगडलेल्या करवंदाच्या जाळ्यांच्या फांद्या वाटेत वाकड्या होऊन आम्हाला ती तोडण्यासाठी आव्हान करत होत्या, पाऊस पडुन गेल्यामुळे वनस्पतींना आलेल्या फुलांनी पायदळी सडा टाकलेला दिसत होता. कधी भैरवगड धुक्यात हरवत होता तर कधी अचानकच दर्शन देत लक्ष वेधून घेत होता. चढाईला लागलो होतो. चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. माथ्यावर पोहचताच भैरवगडाचे संपूर्ण दर्शन घेतले. येथे दोन चार फोटो घेत.आता माथ्यावरील भैरवनाथाच्या दर्शनासाठी वरसाच्या वृक्षापाशी थांबलो. सोबत आणलेल्या खडीसाखरेचा नैवेद्य भैरवनाथाला अर्पण करत व दर्शन घेत पुढे झालो. गर्द झाडीत सरबत विकणा-या झोपडी समोरील लाकडाच्या बाकावर दोन घुट पाण्याचे घेण्यासाठी क्षणभर विसावलो. खाली पडलेल्या भोकराच्या पिकलेल्या फळाकडे लक्ष गेले. उचलत तोंडात टाकले व चालायला सुरुवात केली. वाटेत दिसणा-या कोळु, केना रानकेळी अशा विविध रानभाज्यांची ओळख करून देत कमळु चालला होता.
खांबटाके गाठले होते. येथेच पत्नीने दिलेली शिदोरी सोडली. लसणाची चटणी व आंब्याच्या लोणच्याचा आस्वाद घेत पोटपुजा केली. टाक्यातील थंडगार पाणी भरून घेत चालू लागलो व काही वेळातच भैरवगडाच्या खिंडीत म्हणजे मुख्य राजमार्गाच्या पायरीवाटेवर अगदी सव्वा तासातच पोहचलो. येथे पोहचताच सुरक्षित साधनांचा पेहराव केला. हार्नेस, हेल्मेट घालून दोन फोटो खिंडीतील काढून ट्रेकला सुरूवात केली. कमळुकडे काही बीया रोपणासाठी दिल्या व काही माझ्या खिशात ठेवल्या.
सुरुवाती पासूनच थराराला सुरुवात झाली होती. भैरवगडाच्या खिंडिच्या पुर्वेकडील भागात प्रथम आडवा प्रवास करत पुढे जायचे होते. कदाचित कधी भैरवगड प्रवास केला तर खिंडित उभे राहुन पुर्वेकडचा उजव्या हाताचा भाग न्याहळुन पहा तो पाहताच अंगावर शहारे येतात. तेथुन सुरूवात झाली होती. दहा बारा पावले टाकली असतील तोच बिबट्याने डरकाळ्या फोडायला सुरुवात केली होती. त्या आवाजाने खाली दरीत वानरांची धावपळ सुरू झाली होती. आम्हाला पण चालायला वाघाच बळ मिळालं होत. त्या आवाज जणू आम्हाला सांगित होता की हा ट्रेक करायला वाघाच काळीजच असावं लागतं. भिणारांच हे अजिबात काम नाही. ज्या उमेदीने भैरवगड गाठलाय तीच उम्मीद शेवटपर्यंत कायम ठेवा कुठेच अडचण येणार नाही. जेथे जेथे थांबणे शक्य होत होते तेथे तेथे बीया रोपण करत आम्ही पुढे सरकत होतो. कमळु पुढे मी पाठीमागे. ना झाड ना झुडुप. खडकावरील गवताच्या असलेल्या घट्ट बेंदाड्या काय तो आधार देत होत्या. एक छोटीशी चुक क्षणात खेळ खल्लास करणारी होती. पावले तोलून मापूनच पुढे टाकली जात होती. तन मन एकाग्र चित्ताने एकत्र येऊन काम करत होते. कमळुच्या मार्गदर्शनाशिवाय हात पाय हलवणं अशक्य होते. दगडाच्या खाचेत हात घालायचा म्हटले तर तो प्रथम चेक करूनच आम्ही चालत पुढे सरकत होतो. आडवा टप्पा पार पाडला होता. आता मातीचा वाळलेल्या गवताच्या टप्प्यातुन वर चढणीला लागलो होतो. पायाखालची माती सरकत होती. हाताची बोटं मातीत खुपसून पुढे पाय टाकत होतो. या तीव्र उतारावर बीया रोपण करत पुढे जात होतो. आता कारव्यांच्या भागात प्रवेश केला होता. येथे कारव्यांचा चांगला आधार मिळत होता. या ठिकाणी खुप प्रमाणात बीज रोपण करता आले व शेवटी तेथे असलेल्या एका छोट्या झाडापाशी आम्ही पोहचलो. तेथुन वर चढत आम्ही घळीत प्रवेश केला. वरुन सरळ कड्यावरुन घसरून नळीत पडुन मेलेल्या सांबरांचे हाडे येथे मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती. येथे पाय-यांचा व खोबण्यांचा आधार मिळत होता. पाय-या छोटाशाच होत्या मात्र त्यांचा आधार खुप मोठा होता. येथून पुढे बीजारोपण हा विषय बंद राहणार होता. उजव्या हाताला अतिशय उंच कातळकडा तर डाव्या बाजूला अतिशय तीव्र उतार होता. ४०/४५ पाय-यांवरचा खेळ संपवत आम्ही दोन घुट पाणी पिण्यासाठी विसावा घेतला. आता पुन्हा मातीचा व गवताचा घसरणीचा टप्पा पार करायचा होता. येथे पण चढाईचा कसं लागणार होता. या मातीत पण बीज रोपण करत तो अवघड टप्पा पार करून आम्ही सांबरांच्या दौंडयाकडे जाणा-या पाउलवाटेवर पोहचलो होतो. आता फक्त १५/२० फुटांचा टप्पा चढून दौंड्या खिंडीत प्रवेश बाकी राहीला होता. येथे मात्र उभे राहुन फोटो काढण्यासाठी चांगलीच जागा होती. अनेक फोटो घेत आम्ही तो शेवटचा टप्पा अगदी सोपा करत खिंडीत पोहोचलो. खिंडीत उभे राहुन खाली डोकावून पाहिले तर डोळे गरगरु लागले. खरच येथून वर चढलो होतो का? स्वप्न पहात असल्याचा भास झाला. एक हातावर चिमटा काढून पाहीला तर स्वप्न नाही तर हा प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचे समजले. नाणेघाटाकडे भैरवगडाच्या माथ्यावरुन काही खास गुप्त व अतितातडीचा सांगावा धाडण्यासाठी तर या वाटेचा वापर केला गेला असावा असेच वाटले. कारण अगदी छोट्या पाय-या कोरून हा मार्ग तयार करण्यात आल्याचे जाणवले. एका वेळी एकच मनुष्य येथून चढू शकतो. या मार्गावर चुकीला माफी ही नाहीच. हा ट्रेक करताना दुर्घटना से देर भली असाच हा ट्रेक करणे म्हणजे जमेची बाजू आहे. ज्या ट्रेकर कडे खुप सारा डोंगर द-या चढण्याचा व गिर्यारोहनाच्या अनुभवाबरोबरच त्यासाठी लागणा-या साहित्याच्या वापराचा अनुभव असेल त्यानेच या पाउलवाटेला स्पर्श करावा अन्यथा दरीत पडलेले शरिर पण बाहेर काढणे सोपे नाही. कारण एक झाड सोडले तर मध्ये एकही आधारासाठी जागा नाही. कदाचित आम्ही लावलेल्या बीया जर रूजल्याच तर भविष्यात धरायला थोडाफार आधार तरी होइल. परंतु सतत होत असलेल्या स्लायडींगमुळे बीया रूजुन वर आल्या तर त्या टिकतील की नाही याची पण खात्री देता येत नाही. विश्रांती पाय-यापाशी व मध्यंतरी नाळेत घेता येते. या दरम्यान कुठेही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व मार्ग व त्याची भयानकता पाहता या ट्रेकला गवसणी न घातलेलीच बरी असेच सांगावेसे वाटते.
दौंड्या खिंडीतून पुढील चढाई अगदी सोपी होती. अंजणावळ्याच्या व-हाडी डोंगर माथ्यावर पंख फुटुन भरारी घेण्याच बळ मात्र मिळालं होतं. येथे मात्र पाणी ओढ्याच्या डोहात उपलब्ध होत व येथेच पुढे मोठी नैसर्गिक गुहा पण आहे. येथील डोंगर माथ्यावर अगदी काही मिनिटांतच आम्ही पोहचलो. येथुन दिसणा-या भैरवगडाच्या दिसणा-या भयानक रुपाचे मात्र संपूर्ण दर्शन घेतले. काही फोटो टिपत अंजणावळ्याच्या डोंगर रांगेला गवसणी घातली. काळ्या ढगांनी एकत्र यायला सुरुवात केली होती. आम्ही उतरणीच्या माथ्यावर पोहचलो होतो. येथेच न्याहरी करण्याचा निर्णय घेत सोबत असलेली शिदोरी सोडली. पोटातील कावळ्यांना शांत करत उतरणीला लागलो. समोरच एका तरस प्राण्याने दर्शन देत धूम ठोकली. काळ्या ढगांची गर्दी पाहून आमच्या पायांची उचलण्याची गती दुप्पट झाली होती. ३० मिनिटांत आम्ही अंजनावळे गाव गाठणार होतो. संपूर्ण उतार उतरुन जंगलात प्रवेश केला होता. गावरान आंब्याचे पिकलेली फळे खाली पडलेली दिसून येत होती. ती हातात गोळा करून व त्यांचा आस्वाद घेत चालू लागलो. पुढे वाटेत पिकलेल्या जांभळाच्या झाडावर आमची नजर खिळून राहीली. कमळुच्या पाठिवरील बॅग क्षणात खाली घेत त्याने जमिनीवर टेकवली. व जांभळीच्या झाडावर सरडा होऊन तो सरसर चढून गेला. पाचच मिनिटांत दोन ओंजळभर जांभळे खिशातुन काढलेल्या पिशवीत त्याने साठवीत खाली उतरला. पुन्हा जांभळाचा आस्वाद घेत आम्ही चालू लागलो. फांगुळगव्हाणवरून अंजनावळ्यात दुचाकीवरून घ्यायला साहेबराव बुळे येणार होता.आता काळ्या ढगांचा खेळ सुरू होणार असे वाटत होते. अंजणावळ्याचा रस्ता आम्ही गाठला होता. साहेबराव आमची वाट पाहतच होता. आम्ही दुचाकीवर बसुन भोरांड्याच्या नाळेकडे मार्गस्थ झालो. तालीश हॉटेलच्या प्रवेशद्वारा जवळ पोहचताच काळ्या ढगांनी एकमेकांना कडाडून आलिंगन द्यायला सुरुवात केली होती. त्यांचे अलिंगण पहायला मेघराजा उपस्थित झाला होता. दुचाकी उभी करत आम्ही आडोशासाठी तालीश हॉटेलच्या स्टाफच्या मुलांच्या खोल्यांकडे जोरातच धुम ठोकली. गडगड कडकड आवाजासह आता जोराचा पाऊस सुरू झाला होता. क्षणात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. आमचे नशिब बलवत्तर होते म्हणून नांगदरा ट्रेक पूर्ण होऊन आम्ही सुखरुप खाली पोहचलो होतो. आनंद एवढा झाला होता की लावलेल्या बीया लवकरच रूजणार होत्या. जवळपास अर्धा तास पावसाने चांगलीच हजेरी लावली. दुरवर असलेल्या भैरवगडाकडे नजर टाकली तर दौंड्या खिंडी जवळील कोरडा असलेला धबधबा जोरात वाहताना निदर्शनास पडला. ते दृष्य पाहून कमळुच्या आपसुकच शब्द बाहेर पडले आपण वाचलो. जर का ट्रेक दरम्यान पाऊस आला असता तर आपले काही आज खरे नव्हते. तालिश रिसेप्शन मध्ये बसलेल्या सुभाष कुचिकने आवाज दिला होता. तेथे थोड्या गप्पा गोष्टी करत सुभाषला जांभळे खायला दिली. कमळुला पुन्हा भोरांडेची नाळ गाठुन वालिवरेला जायचं होतं व मला साहेबराव सोबत जुन्नर. एकमेकांच्या भेटी घेत आम्ही आता विरुद्ध दिशेने परतीच्या प्रवासाला लागलो होतो तो सकाळपासून न मिळालेला आराम घ्यायला.
विनंती असेल शक्यतो हा ट्रेक टाळावाच. आम्ही हा ट्रेक विरंगुळा म्हणून निश्चितच केलेला नाही. जुन्नर व मुरबाड तालुक्यातील पसरलेल्या या घाटवाटा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असता व या दरम्यान अपघात होण्याची शक्यता वर्तवीता येत नाही त्यामुळे अशा आपत्ती जनक परिस्थितीत या घाटवाटेची माहीती असावी म्हणून हा आम्ही केलेला हा एक जिवघेणा प्रवास होता. याच वाटेवर झाडे उगवावीत हा पण एक निस्वार्थीपणे एक केलेला छोटासा प्रयत्न होता. कमळुने माझ्यावर या गोष्टीसाठी दाखविलेला विश्वास नक्कीच गरजुच्या मदतीसाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास वाटतो व या वाटेवर मी तरी किती ही जवळचा व विश्वासु ट्रेकर असला तरी पुन्हा या वाटेवर आपत्तीजनक परिस्थिती व्यतिरिक्त कधीच पुन्हा पाय ठेवणार नाही. कमळुचे खुप खुप आभार की आज या आडवाटेवरचा यशस्वी प्रवास आपण घडवून आणलात.
✍️ रमेश खरमाळे, माजी सैनिक
८३९०००८३७०
Comments
Post a Comment